नवी दिल्ली : घोटाळ्यांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी सोमवारी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची त्या संदर्भात भेट घेतली.
शरद पवार यांनी स्वत:च टिष्ट्वट करून या भेटीची माहिती दिली. ते म्हणाले की, पीएमसी बँकेतील खातेदारांच्या साऱ्या अडचणी आपण अनुराग ठाकूर यांच्या कानी घातल्या. आमच्या चर्चेतून नक्कीच काही सकारात्मक घडेल, याची आपणास खात्री आहे. या बँकेतील घोटाळे गेल्या सप्टेंबरमध्ये उघड झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तिच्यावर निर्बंध घातले आहेत, तसेच या बँकेवर प्रशासक मंडळही नेमले आहे. सुरुवातीला खातेदारांना सहा महिन्यांत केवळ १ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. नंतर ती ५0 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, तसेच अत्यंत खातेधारकांच्या अत्यंत अडचणीच्या काळात किंवा विवाह वा तत्सम प्रसंगी कागदोपत्री पुरावे सादर केल्यास अधिक रक्कम देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेने दिला. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पीएमसी बँकेच्या महाराष्ट्रासह सहा राज्यांत मिळून १३७ शाखा आहेत. त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रातच आहेत. बँकेच्या ७८ टक्के खातेदारांना आपली सारी रक्कम काढता आली आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, काही खातेदारांच्या मोठ्या रकमा अद्याप बँकेत असून, त्यांना त्या काढता आलेल्या नाही. त्यात काही उद्योजक व व्यापारी आहेत. त्यांच्या रकमा बँकेत अडकून राहिल्याने त्यांना नवीन गुंतवणूक करण्यात वा लोकांचे पैसे देण्यात अडचणी येत आहेत.