हरिश गुप्ता नवी दिल्ली :
यूपीएचे घटक नसलेल्या प्रादेशिक पक्षांची एकजूट होण्यासाठी योग्य तोडगा काढण्याकरिता काँग्रेसने आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर भरवसा ठेवला आहे. काँग्रेसपासून चार हात दूर असलेला ओदिशातील बिजू जनता दल, आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती आदी प्रादेशिक पक्षांशी आघाडी स्थापन करण्याबाबत नितीशकुमार चर्चा करणार आहेत. या घडामोडींमुळे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे.
यूपीएतील घटक पक्ष असलेले द्रमुक, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस हे विविध प्रसंगी स्वत:चा वेगळा सूर लावताना दिसतात. त्यामुळे या पक्षांपेक्षा नितीशकुमार यांनीच प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करावेत, असे काँग्रेसचे मत आहे.