शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी? दिल्ली दरबारी खलबतं
By महेश गलांडे | Published: December 10, 2020 03:22 PM2020-12-10T15:22:16+5:302020-12-10T15:25:31+5:30
शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यातील विमानतळासंदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही ते भेट घेणार आहेत. मात्र, तत्पूर्वीच दिल्ली दरबारी जाताच, युपीएतील विविध पक्षांच्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे, केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला आव्हान उभारण्याचा प्रयत्न युपीएतील घटक पक्षांचा आहे. त्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे. मात्र, युपीएच्या चेअरमनपदी शरद पवार यांना संधी मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.