नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानाची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. २० तारखेपासून ही सुरक्षा कमी करण्यात आली मात्र याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही अशी माहिती शरद पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पवारांसह आणखी ३९ जणांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शरद पवारांची सुरक्षा हटविण्यात आली आहे. राज्यात शरद पवारांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार सुडबुद्धीने कसं वागतंय, लोकशाही मानत नाही, सुरक्षा व्यवस्था काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का? महाराष्ट्राच्या मनात भाजपाबाबत जो राग होता तो आणखी वाढण्यास मदत होईल अशा शब्दात आव्हाडांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात येते. यामध्ये दिल्ली पोलीस तसेच सीआरपीएफ जवानांचा समावेश असतो. शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानाबाहेर ३ पोलीस अधिकारी आणि सीआरपीएफचे ३ जवान हटवण्यात आले आहेत. याची कोणतीही माहिती पुरविण्यात आली नाही.
यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतली असून त्यांना आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. यावरुन काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.
त्यानंतर सीआरपीएफच्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) सुरक्षा शाखेसोबत एसएसजीच्या प्रभारीने अतिशय जवळून समन्वय राखल्यानंतर ही नवी सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात आली. सीआरपीएफ ताबडतोब गांधी कुटुंब आणि प्रियांका वाड्रा आणि त्यांच्या मुलांना सुरक्षा पुरवील आणि दिल्ली पोलीस बाहेरील सुरक्षा कवच देतील. सीआरपीएफचे महा निरीक्षक (गुप्तचर आणि व्हीआयपी सुरक्षा) पी. के. सिंह यांनी फक्त गांधी कुटुंबासाठीच नव्हे तर इतर अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अतिशय कठोर, असे सुरक्षा नियम बनवले आहेत.