जयपूर - जनता दल संयुक्तचे माजी नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची माफी मागितली आहे. 'वसुंधरा राजे यांच्यासोबत जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या शब्दांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, याबाबत मी त्यांना एक पत्र देखील लिहिणार आहे' असे लोकशाही जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी म्हटले आहे.
शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. 'राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत आणि त्यांना आता आराम द्यायला हवा', असे विधान राजस्थानच्या अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते. दरम्यान, वसुंधरा राजे मध्य प्रदेशची कन्या असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते. शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच याप्रकरणी त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.