पाटणा, दि. 27 - भाजपासोबत आघाडी करुन नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण त्यांचा हा निर्णय शरद यादव यांना फारसा आवडला नसल्याची चर्चा आहे. 70 वर्षीय शरद यादव संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते असून मागच्या अनेकवर्षांपासून ते नितीश कुमारांसोबत पक्ष चालवत आहेत. बुधवारी संध्याकाळी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या घटनेला 24 तास पूर्ण होण्याआधीच भाजपाच्या पाठिंब्याने नितीश कुमार यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
बिहारमध्ये काल संध्याकाळपासून इतक्या वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना शरद यादव यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. गुरुवारी सकाळी पाटण्यात नितीश कुमार यांचा शपथविधी झाला पण त्यावेळी शरद यादव अनुपस्थित होते. अलीकडेच दिल्लीत विरोधी पक्षांच्या दोन बैठका झाल्या. त्यावेळी शरद यादव यांनी आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींविरोधात लढत राहू असे आश्वासन दिले होते.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारी नाट्याला झालेली सुरुवात पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होती. रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. यानंतर नितीश कुमार यांना पत्रकारांशी कोणताही संवाद न साधता थेट घरी जाणे पसंद केले. मात्र सुशील मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शपथविधी सकाळी पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 'आम्ही राज्यपालांना भेटलो आहे. आमच्याकडील 132 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींना दिले आहे.
आम्ही विश्वास ठराव पास करु', असं सुशील मोदी बोलले होते. दरम्यान, 1:30 वाजता राजभवनातून नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी राज्यपालांना भेटून गेल्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांसह तेजस्वी यादव यांनी राजभवनावर आपला मोर्चा काढला होता. यावेळी राजभवनाच्या परिसरात नितीश कुमार विरोधात तेजस्वी यादवांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरजेडीच्या सहा आमदारांना भेटण्याची परवानगी मिळाली होती.