रांची- योगाचं शिक्षण देणारी मुस्लिम तरूणी योगगुरू रामदेव बाबा यांच्याबरोबर स्टेज शेअर केल्याने चांगलीच अडचणीत आली आहे. योग दिनाच्या दिवशी बाबा रामदेव यांच्यासोबत योगा केल्याने प्रसिद्ध झालेल्या राफिया नाज या तरूणीला काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसंच काही मुस्लिम लोकांनी तिच्याविरोधात तोंडी फतवाही जारी केला आहे. राफिया नाज हिला येत असलेल्या धमक्यांमुळे झारखंड पोलिसांनी राफियासाठी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत.
राफिया नाजचा रामदेव बाबांबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली. तिला फेसबुकवरही जीवे मारण्याची धमकी दिली जाते आहे. नाजियाला दोन सुरक्षारक्षक दिले गेले आहेत. योगाभ्यास सुरू ठेवला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकी तिला मिळाली आहे.
राफियाला झारखंड पोलिसांकडून मिळालेल्या सुरक्षारक्षकांमध्ये एक महिला आणि एका पुरूष पोलीसाचा समावेश आहे. राफियाला येत असलेल्या धमक्यांमुळे तिचे आई-वडिलही घाबरले आहेत. इतकंच नाही, तर बुधवारी राफियाच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. घरातून बाहेर आल्यावर काही लोक मला योगा सोडण्याची बळजबरी करतात, असं राफियाने म्हंटलं आहे. धमक्यांमुळे राफिया गेल्या काही दिवसांपासून तणावात आहे.