नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी गजेंद्रसिंह देखील प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमानंतर काही वेळातच प्रणव मुखर्जी यांच्या फोटोमध्ये छेडछाड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. यावरुन प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.
काय आहे व्हायरल फोटोमध्ये ?सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या प्रणव मुखर्जी यांच्या फोटोमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. या फोटोमध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांप्रमाणेच प्रणव मुखर्जीही अभिवादन करताना दिसत आहेत शिवाय त्यांच्या डोक्यावर संघाची टोपीदेखील दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसप्रमाणे अभिवादन केलेले नव्हते व संघाची टोपीदेखील त्यांच्यावर डोक्यावर नव्हती. वडिलांच्या फोटोमध्ये केलेली छेडछाड पाहून शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. ''वडिलांना ज्या गोष्टीबाबत सर्तक करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याची भीती होती, अखेर तेच झाले. भाजपा/ आरएसएसच्या 'dirty tricks dept' चेच हे कृत्य आहे'', असा आरोप शर्मिष्ठा यांनी केला आहे.
प्रणव मुखर्जी यांचे खडेबोल
दरम्यान, या कार्यक्रमात ''आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. देशाला कुठलाही भूगोल, भाषा आणि धर्म-पंथाची चौकट नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशभक्ती ही कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही, असे परखड मत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त करत रा. स्व. संघाला खडे बोल सुनावले.