Sharmishtha Pranab Mukherjee Book: २००४ मध्ये भाजपचे अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार जाऊन काँग्रेसचे युपीएचे सरकार सत्तेत आले. त्यावेळेस डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्यात आले. मात्र, माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे नाव जास्त चर्चेत होते. वास्तविक काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्याची गळ घातली होती. परंतु, सोनिया गांधी यांनी नकार देत डॉ. मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपद देण्यात आले. प्रणव मुखर्जी यांना आपण पंतप्रधान होणार नाही, हे माहिती होते, असे त्यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात म्हटले आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक पुस्तक लिहिले असून, प्रणव मुखर्जी यांची डायरी, त्यांच्याशी होत असलेल्या चर्चा, संवाद, संभाषण यावरून शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काही गोष्टी पुस्तकात नमूद केल्या आहेत. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले आहे की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर बाबांची भेट होऊ शकली नाही. कारण ते खूपच व्यस्त होते. मात्र, फोनवरून संवाद, चर्चा होत असे. त्यावेळेस खूप उत्सुकतेने मी त्यांना विचारले होते की, तुम्ही आता पंतप्रधान होणार ना. या माझ्या प्रश्नावर ते उत्तरले की, नाही. त्या मला पंतप्रधान करणार नाहीत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होतील. ‘इन प्रणब, माइ फादर: ए डॉटर्स रिमेंबर्स’ या नावाने शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पुस्तक लिहिले आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुक करायचे प्रणव मुखर्जी
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिले आहे की, वडिलांना वाटले की, सोनिया गांधी प्रतिभावान, मेहनती आणि शिकण्यासाठी उत्सुक असतात. बाबांनी मला एकदा सांगितले होते की, अनेक राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी त्यांची सर्वांत मोठी ताकद होती की, त्यांना स्वतःमधील कमतरता, कमकुवतपणा यांची जाणीव होती. त्या दूर करण्यासाठी वा त्यावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास त्या तयार असत. राजकीय अनुभवाची कमतरता आहे, हे त्यांना माहिती होते. मात्र, त्यांनी भारतीय राजकारण आणि समाजातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. तर राहुल गांधी हे अतिशय विनम्र आणि जिज्ञासा असलेले व्यक्ती आहेत. मात्र, राजकारणातील डावपेचांसाठी ते परिपक्व झालेले नाहीत, असे बाबा म्हणायचे, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान न मिळाल्याने बाबा कधीही निराश झाले नाहीत. त्यांच्या डायरीत कुठेही याचा उल्लेख नाही. सोनिया गांधींकडून मला कोणतीही अपेक्षा नाही की, त्या त्यांना पंतप्रधान करतील, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितले.