बंगळुरू : कानडी लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत मौन पाळण्यात आल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करून साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका शशी देशपांडे यांनी शुक्रवारी साहित्य अकादमीच्या जनरल कौन्सिलचा राजीनामा दिला.‘साहित्य अकादमी कार्यक्रमांचे आयोजन आणि पुरस्कार वितरणाच्या पलीकडे जाऊन भारतीय लेखकांच्या अभिव्यक्ती आणि लेखन स्वातंत्र्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण मुद्यांकडेही लक्ष देईल, अशी आशा बाळगून आणि अतिशय दु:खी अंत:करणाने मी आपला राजीनामा देत आहे,’ असे ७७ वर्षीय शशी देशपांडे यांनी अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.देशपांडे ह्या अनेक कादंबऱ्या, लघुकथा आणि निबंध संग्रहाच्या लेखिका आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आहेत. २००९ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. ‘कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीचे मौन पाळल्यामुळे मी कमालीचे अस्वस्थ झाले. कलबुर्गी हे साहित्य अकादमीचे सदस्य आणि अकादमीच्या जनरल कौन्सिलचे सदस्यही होते. ते प्रामाणिक व्यक्ती होते,’ असे देशपांडे यांनी म्हटले आहे.‘लेखकांविरुद्धच्या हिंसाचाराच्या घटनांविरुद्ध अकादमी उभी राहणार नसेल, आपल्याच एका सदस्यावरील हल्ल्यावर मौन पाळणार असेल तर देशातील वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध लढण्याची अपेक्षा आपण अकादमीकडून कशी काय करू शकतो? केवळ शोकसभा घेतल्याने काही साध्य होणार नाही,’ अशा शब्दांत देशपांडे यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)
शशी देशपांडे यांचा साहित्य अकादमीचा राजीनामा
By admin | Published: October 10, 2015 1:56 AM