मुंबई- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेते शशी कपूर यांचं सोमवारी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली, पण श्रद्धांजली वाहण्याच्या नादात काहींनी चुकून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनाही श्रद्धांजली वाहिली. थरूर यांच्या कार्यालयात सांत्वन करणारे फोन येऊ लागल्यानंतर शेवटी कंटाळून शशी थरूर यांनी ट्विट करत माझ्या मरणाच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी मी ठणठणीत बरा आहे, अशा आशयाचं ट्विट करत लोकांना चूक निदर्शनास आणून दिली.
अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, शशी कपूर यांनी १६0 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी १२ चित्रपट इंग्रजी भाषेतील आहेत. नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते. त्यानंतर त्यांचे फारसे चित्रपटही आले नाही.कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झाल्यानंतर ते काहीसे खचले. त्यानंतर त्यांची प्रकृतीही खालावली. तेव्हापासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. २0११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २0१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.