‘त्या’ वक्तव्यावरुन शशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 01:19 PM2021-03-27T13:19:53+5:302021-03-27T13:23:16+5:30
काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.
नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर गेले आहेत. कोरोना संकटाच्या काळातील पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे. ढाक्याजवळ असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, तेव्हा अटक होऊन तुरुंगवासही भोगला होता, असे म्हटले. यावर काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी टीका केली होती. मोदी बांगलादेशलाही फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत, अशी टीका थरूर यांनी केली होती. परंतु, आपली चूक झाली आहे, हे लक्षात येताच लगेच कबुली देत पंतप्रधान मोदींची माफी मागितली आहे. (congress shashi tharoor admitted mistake over pm narendra modi bangladesh satyagraha statement)
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते. यावेळी मला अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता, अशी आठवण पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना सांगितली. यावर, “आंतरराष्ट्रीय शिक्षण... आपले पंतप्रधान बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की, बांगलादेशला कुणी स्वातंत्र मिळवून दिलं,” असे ट्विट करत शशी थरूर यांनी टीका केली होती.
I don't mind admitting when I'm wrong. Yesterday, on the basis of a quick reading of headlines &tweets, I tweeted "everyone knows who liberated Bangladesh," implying that @narendramodi had omitted to acknowledge IndiraGandhi. It turns out he did: https://t.co/YE5DMRzSB0 Sorry!
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 27, 2021
चूक झाल्याचे लक्षात येताच प्रांजळ कबुली
काँग्रेस नेते शशी थरूर यांना ट्विट केल्यानंतर टीका करताना चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॉरी म्हणत, माझी चूक असेल, तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे मथळे आणि ट्विट वाचून ट्विट केलं होतं. ‘बांगलादेशला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलंय हे सगळ्यांना माहिती आहे,’ असं मी म्हणालो होतो. नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्यांनी त्याचा उल्लेख केला… सॉरी, असे लगेच दुसरे ट्विट शशी थरूर यांनी केले आहे.
‘‘भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला?’’
सत्याग्रह करण्याची काय गरज होती?
सन १९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेने केलेल्या विरोधाचा सामना करूनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती: पंतप्रधान मोदी
दरम्यान, पूर्व सीमेबाबत भारत निश्चिंत आहे. कारण भारतासोबत बांगलादेश उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी लढण्यासाठी मदत मिळाली, असे कौतुकोद्गार बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यादरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच विरोधी पक्षनेत्यांशीही पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली.