नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते शशी थरूर यांना दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मोदी हे शंकराच्या पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचं विधान केल्याप्रकरणी शशी थरूर यांना शुक्रवारी (7 जून) स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.
भाजपा नेते राजीव बब्बर यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. थरूर यांच्या विधानांमुळे बब्बर यांनी आपल्या भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. 2018 मध्ये थरूर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. पंतप्रधान मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारूही शकत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
बंगळुरू लिट फेस्टमध्ये शशी थरूर सहभागी झाले होते त्यावेळी त्यांना पुस्तकातील काही पाने उपस्थितांना वाचून दाखवली होती. त्यामध्या त्यांनी पिंडीवरचा विंचू असे विधान केले होते. या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. दिल्लीमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्याचवेळी न्यायालयाने शशी थरूर यांना जामीन मंजूर केला. याप्रकरणी आतापुढील सुनावणी 25 जुलै रोजी होणार आहे.
शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांत पराभव झाला, याचा अर्थ आम्ही संपलो, असे समजण्याचे कारण नाही असं म्हटलं होतं. तसेच काही मंडळी तर काँग्रेसचा मृत्युलेख लिहायलाच निघाली आहेत. काँग्रेसची परिस्थिती तितकी वाईट अजिबातच नाही. केरळ व पंजाब या दोन राज्यांत आमची कामगिरी निश्चितच चांगली होती, असे प्रतिपादन शशी थरूर यांनी एका मुलाखतीत केले होते. 'आजही काँग्रेसचा हा भाजपला खरा व विश्वासार्ह पर्याय आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई लढतच राहू. राहुल गांधी यांनी एकट्याने पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेतली आणि पक्षाध्यक्षपद सोडण्याचे जाहीर केले, पण काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांचा पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मान्य नाही. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकांतील पराभवाची अनेक कारणे आहेत आणि त्यावर आता पक्षात विचारविमर्श, मंथन होणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले की, अनेक नेतेही पराभवाला कारणीभूत असू शकतात. आम्ही चुकलो की, आमच्या प्रतिस्पर्ध्याविषयीचे आमचे अंदाज चुकले, हे समजून घेणे गरजेचे आहे' असं थरूर यांनी म्हटलं होतं.