तिरुवनंतपूरम : ‘आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमची लढाई भाजपशी आहे, आपसात नाही,’ असे स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार शशी थरूर यांनी दुसरे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी खुली चर्चा करण्याचे आपले आव्हान म्यान केले. आपल्याला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा नव्हती आणि आताही नाही, असेही ते म्हणाले.
एक दिवसापूर्वीच थरूर यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढणाऱ्या खरगे यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. त्यावर खरगे यांनी ही निवडणूक म्हणजे कौटुंबिक गोष्ट आहे, आपल्याला भाजपशी लढा द्यायचा आहे, अशी भावना व्यक्त केली होती.
आपल्याला या निवडणुकीत मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा नव्हती आणि आताही नाही, असे सांगत दुसरीकडे सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने येथे आले असता केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सुुधाकरन यांनी मात्र खरगे यांना पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी वरील आवाहन केले.