Shashi Tharoor: “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:57 PM2021-12-19T13:57:25+5:302021-12-19T14:01:10+5:30
देशात सध्या स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जात असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: आगामी वर्षात देशभरात होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांसह २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी हळूहळू सर्व पक्ष तयारी करायला लागले असल्याचे सांगितले जात आहे. यातच सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केला आहे.
आताच्या घडीला भाजपविरोधी पक्षांचे लोक वेगवेगळी विधाने करत आहेत, ते भाजपला हरवण्यासाठी एकत्र येतील. कारण, भाजपला हरवणे हेच सर्व पक्षांचे लक्ष्य आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून, जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतले जाईल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावेळी केले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शशी थरूर यांनी सदर दावा केला आहे.
गेल्या सात वर्षांपासून सुशासन गायब
'प्राइड, प्रेजुडिस एंड पंडित्री' या शशी थरुर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. देशात गेल्या सात वर्षांपासून सुशासन गायब असून, सुशासनाची जागा ही घोषणा आणि प्रतिकात्मकतेच्या राजकारणाने घेतली आहे. तसेच देशात सध्या स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जात असल्याचा आरोप शशी थरुर यांनी यावेळी केला. राजकारणात एक आठवड्याचा कालावधीही खूप मोठा असतो. पुढील लोकसभा निवडणुकीला तर अजून अडीच वर्षांचा काळ बाकी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आवाजात बोलणारे लोक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. केवळ भाजपचा पराभवच नाही, तर त्यांची धोरणे आणि राजकारण हेही ध्येय असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली होती. फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सध्याच्या सत्तेविरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणे अत्यावश्यक आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.