लोकशाहीचा मारेकरी शांतिदूत कसा झाला? काँग्रेस नेत्याचे शशी थरुर यांच्यावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:42 PM2023-02-05T18:42:33+5:302023-02-05T19:08:18+5:30
Shashi Tharoor On Pervez Musharraf : शशी थरुर यांनी परवेज मुशर्रफ यांना श्रद्धांजली देताना त्यांचा शांतिदूत असा उल्लेख केला आहे.
Shashi Tharoor On Pervez Musharraf : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते अमायलोइडोसिस या दुर्मिळ आजाराने त्रस्त होते. परवेझच्या मृत्यूनंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी दुःख व्यक्त केले. "एकेकाळी भारताचे कट्टर शत्रू असलेले मुशर्रफ 2002 ते 2007 या काळात शांततेसाठी पुढे आले," असे ट्विट थरूर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनीच त्यांना फटकारले.
काय म्हणाले शशी थरुर?
शशी थरुर यांनी ट्विट केले की, "पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे दुर्मिळ आजाराने निधन झाले. एके काळी भारताचे कट्टर शत्रू, ते 2002-2007 दरम्यान शांततेसाठी पुढे आलेली मोठी शक्ती. त्या दिवसांमध्ये मी त्यांना दरवर्षी संयुक्त राष्ट्रांमध्ये भेटलो. ते अतिशय हुशार आणि त्यांच्या मुत्सद्दी विचारात स्पष्ट होते. दिवंगत आत्म्याला शांती लाभो," असे ट्विट थरुर यांनी केले.
काँग्रेस नेत्याची टीका
थरुर यांच्या ट्विटवर संदीप दीक्षित म्हणाले की, ''जो माणूस लोकशाहीला संपवून हुकूमशाही आणल्यामुळे दोषी ठरवला गेला, तो शांतता दूत कसा असू शकतो?' असा प्रश्न उपस्थित केला. इतकंच नाही तर संदीपने थरुर यांच्यावर निशाणा साधताना कारगिल युद्धाचीही आठवण करून दिली. ते म्हणाले, 'परवेझ मुशर्रफ राष्ट्रप्रमुख बनले तेव्हा तत्कालिन पंतप्रधान वाजपेयींनी त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली. पण याचा अर्थ ते शांतता दूत झालेत असे नाही. तो लोकशाहीचा मारेकरी होता,'' असे दीक्षित म्हणाले.
भाजप नेत्याचा घणाघात
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ट्विटवर आक्षेप घेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. "परवेझ मुशर्रफ - कारगिलचा मास्टरमाइंड, हुकूमशहा, जघन्य गुन्ह्यांचा आरोपी - जो तालिबान आणि ओसामाला "भाऊ" आणि "हीरो" मानत होता. ज्याने आपल्याच मृत सैनिकांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला. त्याचे काँग्रेसकडून स्वागत केले जात आहे. आश्चर्य वाटतंय? काँग्रेसची पाकभक्ती.''
"एकेकाळी मुशर्रफ यांनी राहुल गांधींची एक सज्जन म्हणून प्रशंसा केली, कदाचित म्हणूनच मुशर्रफ काँग्रेसला प्रिय आहेत? 370 ते सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटवर संशय घेणाऱ्या काँग्रेसने पुन्हा पाकिस्तानचा जयघोष केला, पण आपल्याच देशाच्या प्रमुखाला रस्त्यावरचा गुंडा म्हणाले. ही आहे काँग्रेस,'' असे पूनावाला म्हणाले.