नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला सावरण्यासाठी नेतृत्वाची गरज असल्याचं मत काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसने तरुण नेत्याकडे पक्षाचे नेतृत्त्व द्यावे असे म्हटले होते. तरुण नेत्याला नेतृत्त्व करण्याची संधी दिल्यास ते जास्त स्वागतार्ह आहे असं त्यांनी म्हटलं होतं. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अमरिंदर सिंग यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. तसेच काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करा अशी मागणी थरूर यांनी केली आहे.
'प्रियंका गांधी या काँग्रेस अध्यक्षपदाच्या योग्य उमेदवार ठरतील. पक्षाकडून जेव्हा याबाबात अधिकृतपणे अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाईल. तेव्हा प्रियंका गांधी यांनी या पदासाठी पुढे यावे. पण हा निर्णय पूर्णपणे गांधी कुटुंबाने घ्यावा' असं मत शशी थरूर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच अध्यक्षपदी कोण असणार याबाबत स्पष्टता नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी अध्यक्षांची गरज आहे असंही शशी थरूर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याने त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत अद्याप सार्वमत झालेले नाही. त्यामुळे अनिश्चितता निर्माण झालेली असताना अध्यक्षपदाची धुरा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे द्यावी, अशी कुजबुज सुरू झाली आहे. तथापि, काँग्रेस नेत्यांनी उघडपणे त्यांच्या नावाचा पुरस्कार केलेला नाही. कारण अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहत राहुल गांधी यांनी 25 मे रोजीच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केले होते की, काँग्रेस पक्षाने गांधी कुटुंबातील व्यक्तीऐवजी अध्यक्षपदासाठी दुसरी व्यक्ती शोधावी.
तीनदा लोकसभचे खासदार राहिलेले भक्त चरण दास यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले की, तळागाळापासून ते वरिष्ठ पदावरील काँग्रेस पक्षाचे लाखो नेते काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा प्रियंका गांधी यांच्याकडे सोपविण्याची मागणी करतील. ते मागणी करीत आहेत; परंतु त्यांची मागणी योग्य ठिकाणी पोहोचत नाही; परंतु सर्वांची हीच इच्छा आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत एक प्रभावशाली आणि विश्वसनीय नेतेही असावेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेतल्यास प्रियंका गांधी यांना पक्षाध्यक्ष केले जावे आणि पक्षाचे त्यांचे नाव सुचवावे, असे दास यांनी एका वृत्तपत्राला सांगितले होते.