नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. शशी थरूर यांनी प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांच्याबाबत एक ट्विट केले आहे. यावरुन सोशल मीडियात सध्या चर्चा सुरु आहे.
शशी थरूर यांनी ट्विटवर एक शेर पोस्ट करत मिर्झा गालिब यांची असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी ट्विटवर लिहिले की, आज प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांची 220 जयंती आहे. यानंतर शशी थरूर यांनी केलेल्या ट्विटवर गीतकार जावेद अख्तर यांनी आक्षेप घेत चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शशी थरूर यांनी आपली चूक सुधारली.
जावेद अख्तर यांनी ट्विटरवर लिहिले की, 'शशी जी, ज्यांनी तुम्हाला या ओळी दिल्या आहेत, त्यांच्यावर परत कधीही विश्वास ठेवू नये. हे स्वाभाविक आहे की, कोणीतरी आपल्या पोस्टमध्ये या ओळी घातल्या असतील. मात्र, असे करुन त्यांनी आपल्या बौद्धिक विश्वासर्हातेला धक्का पोहोचवला आहे.'
जावेद अख्तर यांच्या ट्विटनंतर शशी थरूर यांनी ट्विट केले. ते म्हणाले,' माझ्याकडून काय झाले होते, त्याबद्दल जाणीव करुन दिल्याबद्दल जावेदजी आणि अन्य मित्रांचे आभार. ज्याप्रकारे प्रत्येक प्रत्येक कोटला विन्स्टन चर्चिलच्या नावे समर्पित केले जाते, त्याचप्रकारे वाटते की, ज्यावेळी लोक शायरी पसंद करतात. त्यावेळी त्याचे श्रेय गालिब यांना देतात. मी माफी मागतो.'
आणखी एका ट्विटमध्ये शशी थरूर यांनी लिहिले की, 'गालिब नेहमी आपल्या सर्वांच्या आवडीचे आहेत. आज त्यांचा जन्मदिवस नाही आहे. मला चुकीची माहिती दिली होती. तरी पण ओळींची मजा घ्या.'