नवी दिल्ली - देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलन सोहळ्यात यंदा मोठे बदल करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे संचलनाचे अंतर कमी करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नियोजित भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनासाठी यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्याने मोदी सरकारला प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी प्रजासत्ताक दिनाला मुख्य पाहुणे नसल्याच्या परिस्थितीत प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द का करू नये? असा सवाल विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. आपल्याकडे प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य पाहुणे नाहीत, अशावेळी एक पाऊल पुढे टाकत हा संपूर्ण सोहळाच का रद्द करू नये" असं ट्विट थरूर यांनी केलं आहे.
प्रजासत्ताक दिनाला नेहमीप्रमाणे परेड पाहण्यासाठी गर्दी जमा करणं हा एक बेजबाबदारपणा ठरू शकतो, असंही शशी थरूर यांनी म्हटलं आहे. बोरिस जॉन्सन यांनी याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येण्याबाबत असमर्थता दर्शवली. "बोरिस जॉन्सन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भारत दौऱ्यावर येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे", असं जॉन्सन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. "कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या प्रकोपामुळे काल रात्रीपासून देशात लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. अशावेळी मी ब्रिटनमध्येच राहणं जास्त संयुक्तीक आहे. ब्रिटनला माझी गरज असून कोरोनाविरोधात लढा देणं महत्वाचं आहे", असं बोरिस जॉन्सन मोदींना फोनवर म्हणाले.
कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल
प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. दरवर्षी राजपथ येथून सुरु होणारं संचलन हे दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत होतं. पण यावेळीचं संचलन दिल्लीच्या विजय चौक येथून सुरु होऊन नॅशनल स्टेडियमपर्यंतच होणार आहे. यंदाच्या संचलनाचे अंतर हे निम्म्याहून अधिक कमी करण्यात आलं आहे. दरवर्षी 8.2 किमी इतक्या अंतरावर संचलन केलं जायचं. पण यावेळी हे अंतर 3.3 किमी इतकंच असणार आहे. याशिवाय हे संचलन पाहण्याची संधी देखील मोजक्या लोकांनाच मिळणार आहे.