नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस कोणतेही वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान केल्यामुळे नाही तर इंग्रजी भाषेमुळे सोशल मीडियावर नेटीझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. 'द पॅराडॉक्सियल प्राइम मिनिस्टर' हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. याच पुस्तकासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अशा एका इंग्रजी शब्दाचा वापर केला आहे, जो पाहता केवळ त्याचा अर्थ समजणं तर दूरच राहिले. साधा त्याचा उच्चार करणंदेखील युजर्सना कठीण झालंय. परिणामी, या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी युजर्सनी डिक्शनरीची मदतही घेतली. पण उपाय शून्यच कारण याचा अर्थ काही केल्या सापडेना.
अखेर युजर्संनी थरुर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'तुम्ही वापरलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरीची मदत घेत आहोत', असे ट्विट करत नेटीझन्स थरुर यांना ट्रोल केले. विशेष म्हणजे कोणत्याही डिक्शनरीमध्ये या शब्दाचा अर्थ मिळत नाहीय. पंतप्रधान मोदींसंदर्भात ट्विट करत त्यांनी floccinaucinihilipilification ( फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन) या शब्दाचा वापर केला आहे.
शशी थरुर यांचे ट्विट :
'द पॅराडॉक्सियल प्राइम मिनिस्टर' या माझ्या नवीन पुस्तकात 400 पानांशिवाय floccinaucinihilipilification वरही प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर पुस्तकाची ऑर्डर करावी', जसे थरुर यांनी हे ट्विट केले तसेच ट्विटरवरील युजर्स आणि मीडिया हाऊस या शब्दाचा अर्थ शोधण्याच्या कामाला लागली. पण अर्थ काही सापडला नाही, उलट या शब्दाची चर्चाच अधिक रंगली. एनडीटीव्हीनुसार या शब्दाचा अर्थ, 'चूक की बरोबर याची शहानिशा न करता कुठल्याही गोष्टीवर टी करण्याची सवय', असा होतो.
पण या ट्विटनंतर नेटीझन्सनी थरुर यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. काही युजर्संनी म्हटलं की, शब्दासोबत ऑक्सफोर्ड डिक्शनरीचे संबंधित पानदेखील जोडायला हवे होते, ज्यावर या शब्दाचा अर्थ उपलब्ध आहे. तर काहींनी म्हटलं की, या शब्दाचा अर्थ मोफत डिक्शनरीमध्ये तरी उपलब्ध असेल. तर काहींनी असा प्रश्नही विचारला की, 'तुमच्या पुस्तकासोबत आम्हाला एक डिक्शनरीदेखील विकत घेण्याची आवश्यकता आहे का?'
दरम्यान, एखाद्या इंग्रजी शब्दाच्या वापरामुळे शशी थरुर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही त्यांच्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे जनतेला डिक्शनरीची मदत घ्यावी लागली आहे.