Shashi Tharoor Viral News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांची त्यांच्या बागेत एका माकडाशी अनोखी भेट झाली. ही घटना बुधवारी (दि.४) घडली. शशी थरूर यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली. तसेच फोटोही शेअर केले आहेत. शशी शरुर यांची पोस्ट निसर्ग आणि प्राण्यांचा आदर करण्याची आठवण करून देणारी ठरली आहे.
शशी थरुर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज एक विलक्षण अनुभव आला. सकाळी बागेत बसून नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाचत बसलो होतो. अचानक माझ्या बागेत एक माकड आले. ते थेट माझ्या मांडीवर येऊन बसले. त्याला दिलेली दोन केळी सुद्धा त्याने अत्यंत शांतपणे खाल्ली. मग त्याने मला मिठी मारली आणि माझ्या छातीवर ते डोके ठेवून झोपले.
सुरुवातीला मला माकड चावण्याची भीती वाटत होती. यामुळे रेबीजचे इंजेक्शन द्यावे लागेल, अशी थोडी काळजी वाटत होती. मात्र, मी शांत राहिलो. वन्यजीवांबद्दलचा आदर आपल्यात खोलवर रुजलेला आहे. आपली डुलकी पूर्ण झाल्यावर माकडाने उडी मारली आणि पळ काढला, असे शशी थरुर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे शशी थरुर म्हणाले की, मला आनंद आहे की, माझा विश्वास खरा ठरला आणि आमची बैठक पूर्णपणे शांत आणि सौम्य झाली. ही घटना आपल्याला शिकवते की, आपण नेहमीच निसर्ग आणि त्यातील प्राण्यांचा आदर केला पाहिजे. दरम्यान, अशाप्रकारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी स्वत:ला आलेला माकड भेटीचा थोडा वेगळा अनुभव शेअर केला आहे.