काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. काँग्रेसच्या दोन गटांमध्ये मोठे मतभेद आहेत. गांधी गटाला गांधी घराण्याचाच अध्यक्ष हवा आहे, परंतू राहुल गांधी यांची अध्यक्षपद न घेण्याची इच्छा आहे. तर दुसऱ्या गटाला गांधीव्यतिरिक्त दुसरा कोणीतरी अध्यक्ष हवा आहे. असे असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर हे रणशिंग फुंकणार असल्याचे समजते आहे.
शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे. थरूर यांनी अद्याप निर्णय घेतला नसून ते लवकरच यावर निर्णय घेऊ शकतात. थरूर यांनी यावर काही बोलण्यास नकार दिला आहे.
थरूर यांनी मल्याळम भाषेत लेख लिहिला आहे. दैनिक मातृभूमीमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी काँग्रेस पक्षातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीचे आवाहन केले आहे. पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे. एआयसीसी आणि पीसीसी प्रतिनिधींमधून या महत्त्वाच्या पदांवर पक्षाचे नेतृत्व कोण करणार हे पक्षाच्या सदस्यांना ठरवू द्या. या नेत्यांना पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी विश्वासार्ह जनादेश देण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
पक्षाला पूर्णपणे पुनरुज्जीवित करणे आवश्यक असले तरी, नेतृत्वाची जागा तातडीने भरणे गरजेचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत.