नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे त्यांची पत्नी दिवंगत सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाकडून लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे संकेत दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी आज येथे दिले. पोलीस मुख्यालयात यासंदर्भात बोलताना बस्सी यांनी, येत्या काही दिवसांत काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. आम्ही हे काम लवकरात लवकर संपवू इच्छितो. एसआयटी याबाबत वेगाने पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे असे मत व्यक्त केले.एक वर्ष जुने झालेले व्हिसेराचे नमुने आता नाश पावल्याची शक्यता फेटाळून लावताना त्यांनी हे नमुने प्रिझर्व्हेटिव्हजमध्ये ठेवण्यात आले असून, ते एका निश्चित कालावधीसाठी सुरक्षित आहेत, असे सांगितले. या नमुन्यांना पाठविण्याबाबतचा एक निर्णय येत्या काही दिवसांत होणार असून ते अमेरिका किंवा ब्रिटनला पाठविण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत एसआयटीने ज्या व्यक्तींकडे चौकशी केली त्यातून काय निष्पन्न झाले या प्रश्नाला उत्तर देताना बस्सी यांनी, सर्व बाबींची दखल घेतली जात असून निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचू असे म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुनंदाप्रकरणी लवकरच शशी थरूर यांची चौकशी
By admin | Published: January 17, 2015 2:16 AM