काँग्रेस युक्त भाजपा! 'छोड़कर जा रहे हैं घर अपना...', आरपीएन सिंह यांच्यावरून शशी थरूरांचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:53 AM2022-01-26T11:53:00+5:302022-01-26T12:23:06+5:30
Shashi Tharoor : शशी थरूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता भाजप काँग्रेससारखा दिसत आहे, कारण भाजपमध्ये अनेक नेते सामील झाले आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग यांच्यावर काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याबद्दल निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून भाजपाच्या 'काँग्रेस-मुक्त भारत'ला प्रत्युत्तर म्हणून 'कांग्रेस युक्त भाजपा' असा टोला हाणला आहे. शशी थरूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता भाजपा काँग्रेससारखा दिसत आहे, कारण भाजपामध्ये अनेक नेते सामील झाले आहेत.
शशी थरूर यांचे ट्विट...
'छोड़कर जा रहे हैं घर अपना
शायद उनके कुछ और सपने हैं
अब उधर भी सब अपना सा है
अब उधर भी तो सभी अपने हैं'
(कांग्रेस युक्त भाजपा!)
छोड़कर जा रहे हैं घर अपना
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 26, 2022
शायद उनके कुछ और सपने हैं
अब उधर भी सब अपना सा है
अब उधर भी तो सभी अपने हैं
(काँग्रेस युक्त भाजपा!)
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का देत आरपीएन सिंह यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांनी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ट्विटरवर शेअर करत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात एक नवीन अध्याय सुरू करत असल्याची घोषणा केली.
आरपीएन सिंह हे काँग्रेसचे झारखंड राज्य प्रभारी होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांची स्टार प्रचारक म्हणूनही नियुक्ती केली होती. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलवण्याच्या इराद्याने पक्षात प्रवेश केल्यानंतर आरपीएन सिंह भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत म्हणाले, 'काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. मी तात्काळ प्रभावाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडत आहे. मला देश, जनता आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.'
आरपीएन सिंह यांच्याआधी ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, रायबरेलीच्या आमदार आदिती सिंह यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील पडरौना मतदारसंघातून आरपीएन सिंह यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नुकतेच भाजपा सोडून समाजवादी पार्टीमध्ये दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांना भाजपा कडवे आव्हान देऊ शकते, असे मानले जात आहे.