चेन्नई : अवैध संपत्ती जमविल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या व्ही. के. शशिकला आणि त्यांनी नेमलेले पक्षाचे उपसरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांची विलीनिकरण झालेल्या अण्णा द्रमुक पक्षातून सोमवारी हकालपट्टी करण्यात आली. तसेच दिनकरन यांनी पक्षात केलेल्या नियुक्त्या व हकालपट्ट्या अवैध ठरविणारा ठरावही पक्षाने संमत केला. दिनकरन हे शशिकला यांचे भाचे आहेत.या हकालपट्टीमुळे अण्णा द्रमुकवर शशिकला, दिनकरन आणि त्यांचे समर्थक यांचा कोणताही ताबा राहिलेला नाही. मात्र २२ आमदार दिनकरन यांच्यासोबत असून, त्यामुळे सरकार अल्पमतात गेले आहे. पक्ष मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर पक्षाचे खासदार एस. मुत्तुकरप्पन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिनकरन यांची पक्षातील नेमणूक अवैध होती. अण्णा द्रमुकला लवकरच केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी केले जाणार असून, त्यानंतर त्यांच्या काही खासदारांना केंद्रात मंत्रिपदे दिली जातील, अशी जोरदार चर्चा आहे. भाजपाने दक्षिणेकडील राज्यात पाय रोवण्यासाठी ही खेळी खेळण्याचे ठरविले आहे.
शशिकला, दिनकरन यांचीअण्णा द्रमुकमधून गच्छंती, पक्षाची कारवाइ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 4:50 AM