ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 22 - अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के.शशिकला यांची तुरुंगातील खतरनाक शेजारीण सायनाइड मल्लिका उर्फ के.डी.केपाम्माला दुस-या तुरुंगात हलवण्यात आले आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरलेल्या शशिकला यांना पाराप्पाना आग्रहारा मध्यवर्ती कारागृहात सायनाइड मल्लिकाच्या शेजारील बराकमध्ये ठेवण्यात आले होते.
मागच्या आठवडयात ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शशिकला यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मल्लिकाला बेळगावच्या हिंदालगा तुरुंगात हलवण्यात आले. सायनाइड मल्लिका महिला गुन्हेगारी जगतातील पहिली सीरियल किलर आहे. सायनाइड मल्लिकाने सहा महिलांची हत्या केली.
मल्लिकाची गुन्हे करण्याची एक पद्धत होती. ती मंदिरात जाणा-या श्रीमंत महिलांबरोबर मैत्री करायची. त्या महिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर चलाखीने त्यांना सायनाइड द्यायची. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने काढून पोबारा करायची. तिला 2008 मध्ये अटक झाली. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लिका आणि शशिकलाची मैत्री झाली होती. शशिकलाला जेवणाच्या रांगेत उभे राहू न देता ती स्वत: शशिकलासाठी जेवण घेऊन यायची.