नवी दिल्ली : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनाशी संबंधित काही फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर आता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कुटुंबियांनी सुद्धा ताश्कंदमध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूसंदर्भातील दस्तावेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.माजी पंतप्रधानांचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याचे आवाहन केले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतरचा प्रसंग नजरेसमोर येतो तेव्हा त्यांचा मृत्यू रहस्यमय आणि अनैसर्गिक होता असे वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शास्त्री म्हणाले, माझ्या वडिलांचे पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले तेव्हा त्यांचे शरीर निळे पडले होते. चेहरा निळा पडला होता आणि काही ठिकाणी पांढरे डाग दिसत होते. आईने पार्थिव बघितले तेव्हा त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही हीच तिची पहिली प्रतिक्रिया होती. १९६६ साली तत्कालीन सोव्हियत संघाच्या ताश्कंद येथे लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन झाले होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानी नेत्यांसोबत वाटाघाटी करण्याकरिता ते तेथे गेले होते. (वृत्तसंस्था)
शास्त्रींचा मृत्यू अनैसर्गिक
By admin | Published: September 26, 2015 11:57 PM