नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा सिन्हा यांनी ट्विट करून मोदींवर खोचक टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यावरून सिन्हा यांनी मोदींवर निशाना साधताना म्हटले की, मोदीजी किमान एक तरी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांचा सामना करा. आता निवडणुकीची तारीख ही घोषित झाली आहे. त्यामुळे आता तरी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकार परिषद घेऊन टाका. परंतु ही पत्रकार परिषद बनावटी नसावी. तसेच केवळ दरबारातील पत्रकार या परिषदेला उपस्थित नसावे, अशी विनंतीही सिन्हा यांनी केली. अन्यथा लोकशाहीच्या इतिहासात मोदींजी तुम्ही पंतप्रधान म्हणून तुम्ही सर्वात खाली जाल, असंही सिन्हा यांनी नमूद केले.
यावेळी सिन्हा यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी मोदींना प्रश्न विचारला की, तुम्हाला वाटत नाही का, सरकार बदलण्यापूर्वी आणि नवीन नेतृत्व येण्याच्या आधी तुम्ही एनडीएच्या सर्व पक्षांसोबत माध्यमांना सामोरे जावे. तुम्ही कार्यकाळाच्या शेवटच्या आठवड्यात आणि महिन्यात उत्तर प्रदेश, बनारस या भागांत 150 हून अधिक योजनांची घोषणा केली आहे. तरी मी तुम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो, असंही सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले. याआधी अनेकदा सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर टीका केली आहे. तसेच मोदी यांच्या विरोधातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.