नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा झटका बसल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे. ट्रम्प असो, 'मित्रों' असो किंवा कोणताही विरोधी पक्ष नेता असो, अहंकार हा प्रत्येकासाठी घातक असतो, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतच भाजपाचा धुव्वा उडाला. या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमध्ये सिन्हा यांनी म्हटले आहे की, या निकालानंतर मला फक्त माझे मित्र योगी आदित्यनाथ यांच्यासाठी वाईट वाटत आहे. त्यांना घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला. मात्र, अतिआत्मविश्वासामुळे आमचा पराभव झाल्याचे त्यांचा मुद्दा अगदी योग्य आहे. मी वारंवार हेच सांगत आलो आहे की, लोकशाही राजकारणात अहंकार, तापटपणा आणि अतिआत्मविश्वास हे तुमचे सर्वात मोठे शत्रू असतात. मग ते कोणीही असो. ट्रम्प असो, 'मित्रों' असो किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचा नेता असो. सिन्हा यांच्या ट्विटमधील 'मित्रों' या शब्दाचा रोख अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. सिन्हा यांनी यापूर्वीही अनेक जाहीर व्यासपीठांवरून नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि धोरणांवर टीका केली आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला आहे. पुढील लोकसभा निवडणुकांसाठी ही धोक्याची घंटा मानले जाते. गोरखपूरमधून आदित्यनाथ पाच वेळा लोकसभेवर गेले होते. त्यापूर्वी महंत अवैद्यनाथ तीन वेळा जिंकले होते. २७ वर्षांनंतर भाजपाची ही जागा गेली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रवीण कुमार निषाद यांनी भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. फुलपूरमध्ये सपाचे नागेंद्र सिंग पटेल यांनी भाजपाचे कशलेंद्र सिंग पटेल यांचा ५९ हजार मतांनी पराभव झाला.
ट्रम्प असो किंवा 'मित्रों' असो, अहंकार हा घातकच; उत्तर प्रदेशातील पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 3:44 PM