नवी दिल्ली : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्कारावा लागला. या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर विरोधकांनी हल्लाबोल सुरु केला आहे. यातच नेहमीच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेतली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
ट्विटरवरुन शत्रुघ्न सिन्हा यांनी सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, कृपया आम्हाला सांगा, असा सवाल विचारला आहे. डॅशिंग, डायनॉमिक आणि चार्मिंग राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. पाच राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली. तसेच, रणदीप सुरजेवाला, शक्तिसिंह गोहिल, आर के आनंद, के. सी. वेणुगोपाळ आणि इतरांचे अपेक्षित यशाबद्दल अभिनंदन करतो, असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर म्हटले आहे.