देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय क्षेत्रात त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. राम मंदिर हा भाजपाचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. राम मंदिरावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, "पहिल्याच दिवशी पाच लाख लोक अयोध्येत पोहोचले होते. आता फक्त एक हजार लोक येत आहेत. मंदिराचा खूप प्रचार झाला, पहिल्या दिवशी 5 लाख लोक आले, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही संख्या 3 लाखांवर आली, त्यानंतर ती खाली येऊन 2 लाख झाले. आता फक्त एक ते दोन हजार लोक तिथे जात आहेत. कारण ज्या ठिकाणी शंकराचार्य पोहोचले नाहीत, तेथे फक्त प्रसिद्धी केल्याचं लोकांना समजलं आहे"
शत्रुघ्न सिन्हा एकेकाळी भाजपामध्ये होते. मात्र हायकमांडवर नाराज होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधींच्या पक्षातही ते फार काळ टिकले नाहीत. शत्रुघ्न सिन्हा आता तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोलमधून टीएमसीचे खासदार आहेत. आपल्या एका जुन्या मुलाखतीत शत्रुघ्न यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान मोदींविरोधात देशाच्या पंतप्रधानांचा चेहरा बनवण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या मते ममता दीदी पंतप्रधान होण्यासाठी योग्य चेहरा आहेत.
22 जानेवारीला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात चित्रपट, राजकीय, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले होते. रामललाचे अलौकिक रूप पाहून सर्वजण धन्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्री रामाची पूजा केली होती. सर्व रामभक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही.