नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी 'काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे' असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे शुक्रवारी (26 एप्रिल) एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली आहे. काँग्रेस हा जिना यांचा पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात त्यांचाही सहभाग आहे असं सिन्हा यांनी म्हटलं आहे. 'काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखं होतं' असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.
भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपा पक्ष हा लोकशाहीवर नव्हे, तर हुकूमशाहीवर चालतो. भाजपामध्ये वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं होतं. शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहार काँग्रेस प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांना भाजपाचे प्रभारी म्हटलं होतं. त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळताना त्यांनी बिहार आणि गुजरातमध्ये भाजपाचा असलेला पाठीचा कणा, असं गोहिलांना उद्देशून म्हटलं होतं. परंतु तात्काळ त्यांची चूक उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनीही लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी आपल्याच अंदाज स्पष्टीकरणही दिलं होतं. आज भाजपाचा स्थापना दिवस आहे आणि मी इथे नवीन खेळाडू आहे. तेव्हा असं होणारच. इथे उपस्थित सर्वच सज्ञान आहे, त्यामुळे ते मला समजून घेऊ शकतात असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते. काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने पाटणा-साहिब येथून उमेदवारी दिली. त्यामुळे पाटणा-साहिब लोकसभा मतदारसंघामध्ये आता भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात लढत रंगणार आहे.