बिहार - भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी (23 मे) दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपामधूनकाँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भाजपाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे बिहारमधील उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर यावेळी काहीतरी गेम खेळला गेला असल्याचा संशय शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना 604956 मतं मिळाली तर शत्रुघ्न सिन्हा यांना 321840 मतं मिळाली आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 'या निवडणुकीत काहीतरी मोठा गेम खेळला गेला आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांचे निकाल पाहता येथे मोठ्या प्रमाणात नक्कीच काहीतरी गेम झाला आहे. अर्थात हे सर्व बोलण्याची ही योग्य वेळ नाही.' असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांचे मी अभिनंदन करतो. हे दोघेही उत्तम रणनीतीकार आहेत. माझे जुने मित्र रविशंकर प्रसाद यांना देखील शुभेच्छा देतो. पाटणा आता 'स्मार्ट सिटी' बनेल अशी आशा करतो,' असं म्हणत शत्रुघ्न यांनी त्यांना मतं देणाऱ्या मतदारांचे देखील आभार मानले आहेत.
पाटणासाहिब मतदारसंघातून पराभूत झालेले सिन्हा यांनी आपली खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली. सत्याशी आणि तत्वांशी तडजोड न करण्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचे सिन्हा यांनी म्हटले. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचा निकटवर्तीय असण्याचा आपल्याला फटका बसला. माझं तत्वांशी एकनिष्ठ राहणे त्यांना पसंत नव्हते. भाजपामधील लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत झाले आहे. त्याचे अनेक उदाहरणे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय व्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. संविधानावर सतत हल्ले करण्यात येत आहेत, असल्याने आपण भाजपापासून दुरावल्याचे सिन्हा यांनी म्हटले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा पक्ष मोठाच असतो आणि पक्ष हा देशापेक्षा मोठा असतो, यावर माझा विश्वास आहे. माझं सत्यासोबत असणे मोदी ऍन्ड कंपनीला खटकत होते. त्यांनी मला अनेकदा निमूटपणे सर्वकाही पाहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर दडपण आणल्याचे सिन्हा यांनी नमूद केले.दरम्यान ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि लालू प्रसाद यादव यांनी आपल्याला त्यांच्या पक्षात येण्यासाठी विनंती केली होती. परंतु आपण काँग्रेसमध्ये सामील झालो. त्याचे दोन कारणं होती. एक म्हणजे, राहुल गांधी उद्याचा चेहरा आहेत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी तीन राज्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला. राहुल यांनी सिद्ध केलं की, कोण पप्पू आणि कोण फेकू, असा टोलाही सिन्हा यांनी यावेळी लगावला.