ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत विमान प्रवासबंदी करणा-या एअर इंडियाला अभिनेता आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी चांगलंच झापलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी आणि संताप व्यक्त करत ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही, अशा शब्दात एअर इंडियाला सुनावलं आहे. एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण केल्यानंतर एअर इंडियासोबत अन्य खासगी कंपन्यांनी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली होती.
शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. "कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा खासदाराचं विमानातील असं वागणं कोणीही खपवून घेतलं नसतं. मात्र एअर इंडिया किंवा इतर कोणतीही एअरलाईन अशाप्रकारे चौकशी न करता एखाद्या प्रवाशावर बंदी आणू शकत नाही. एअर इंडिया तुमची खासगी मालमत्ता नाही", अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हा यांनी झापलं आहे.
शिवसेनेनं या प्रकरणी संसदेत विमान कंपन्यांविरोधात हक्कभंगही दाखल केला आहे. पण हक्कभंग दाखल केल्यानंतरही एअर इंडियाच्या भूमिकेत कोणतीही नरमाई आलेली नाही. एअर इंडियासह सात एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे.
खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला देण्यात आली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले आहे.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली होती.