लखनऊ: काँग्रेस नेता आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. कालच पूनम सिन्हा यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. लखनऊ मतदार संघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात पूनम सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, लखनऊ मतदार संघात काँग्रेसकडून आचार्य प्रमोद कृष्णम निवडणूक लढवत आहेत. आज दुपारी 12 वाजता यासंदर्भात पूनम सिन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत.
भाजपाचे खासदार असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना बिहारमधील पाटणा साहिब येथून लोकसभेची उमेदवारीही जाहीर झाली आहे. त्यानंतर आता पूनम सिन्हा या लखनऊ येथून लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेरीस पूनम सिन्हा यांनी काल, मंगळवारी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.
लखनऊमध्ये सुमारे तीन ते साडेतीन लाख कायस्थ मतदार आहेत. तसेच सुमारे सव्वा लाख सिंधी मतदार आहेत. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना लखनऊ येथून उमेदवारी देण्यात यावी, असा सल्ला समाजवादी पार्टीच्या काही नेत्यांनी दिला होता. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी लखनऊ मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी राजनाथ सिंह हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.