रांची : चित्रपट अभिनेते व भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांची शनिवारी भेट घेऊन त्यांचे पुत्र तेजस्वी यांची स्तुती केली. तेजस्वी हे बिहारचे भविष्य आहेत, असेही ते म्हणाले.लालूंच्या भेटीच्या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासमवेत माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय हेही होते. लालू आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत व सुख-दु:खाच्या वेळी आम्ही बरोबर असतो. या भेटीत कौटुंबिक चर्चा झाली. परंतु राजकीय चर्चा झालेली नाही, असेही शत्रुघ्नसिन्हा या वेळी म्हणाले. लालूप्रसाद यादव यांना कोट्यवधींच्या चारा घोटाळ्यात शिक्षा झालेली असून, सध्या ते रिम्स रुग्णालयात दाखल आहेत.लालूंशी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणत असले तरी ज्या काळात ही चर्चा झाली, तिला राजकीय पार्श्वभूमी नक्कीच आहे. कारण मागील गुरुवारी नवी दिल्लीमध्ये तेजस्वी यादव हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, आरएसएलपीचे उपेंद्र कुशवाह व एचएएम नेते जितन राम मांझी यांच्यासमवेत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महागठबंधनच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत.शत्रुघ्न सिन्हा यांनी एक बाब सातत्याने स्पष्ट केलेली आहे की, स्थिती बदलली तरी माझा मतदारसंघ तोच राहील. त्यांनी पाटणा साहिबचे भाजपतर्फे सलग दोन वेळा संसदेत प्रतिनिधित्व केलेले आहे.राजदकडून लढणार?शत्रुघ्न सिन्हा हे भाजपमध्ये असले तरी ते सातत्याने भाजपवर टीका करीत आलेले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट नाकारले तर ते लालूंच्या पक्षातर्फे पाटणा साहिबमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, अशीही चर्चा या भेटीच्या निमित्ताने रंगत आहे.
शत्रुघ्न सिन्हांनी घेतली लालूंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 4:46 AM