एस. पी. सिन्हापाटणा : चित्रपटांमध्ये डबल रोल करणारे शत्रुघ्न सिन्हा यांना आता राजकारणातही डबल रोल करण्याची वेळ आली आहे. ते बिहारच्या पाटणा साहिब मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांच्या लखनौमधील प्रचारासाठी ते समाजवादी पक्षाच्या व्यासपीठावर दिसत आहेत.
गेल्या निवडणुकीपर्यंत ते भाजपच्या मंचावर दिसणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिका यंदा पूर्णपणे बदलल्या आहेत. राजकारणातील पटकथा त्यांनीच बदलून टाकली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी यंदा त्यांना पाटणा साहिबमधून लढत द्यावी लागत आहे. आतापर्यंत ते भाजपतर्फे येथून मोठ्या मताधिक्याने निवडून येत असत.
गंमत म्हणजे त्यांच्या पत्नीही लखनौमध्ये केंद्रीय मंत्र्यांविरोधातच निवडणूक लढवत आहेत. ते आहेत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह. शिवाय लखनौमध्ये काँग्रेसतर्फे आचार्य प्रमोद कृष्णम हेही रिंगणात आहेत; पण पूनम सिन्हा यांचा प्रचार करताना शॉटगन सिन्हा यांना काँग्रेसच्या उमेदवाराला मते देऊ नका, असे सांगायचीही वेळ आली आहे.
पूनम सिन्हा यांच्या रोड शोला शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते. पूनम यांनी समाजवादी पक्षातर्फे अर्ज भरला़ रोड शोद्वारे त्यांनी समाजवादी पक्षाच्या पूनम सिन्हा यांना मते द्या, असे आवाहन केल्याने लखनौमधील काँग्रेसचे उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम संतापले. सपच्या उमेदवाराला मते द्या, असे सांगताना शत्रुघ्न सिन्हा यांनी अखिलेश यादव हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत, असेही जाहीर करून टाकले. बिहारमध्ये मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदास पात्र आहेत, असे त्यांना सांगावे लागत आहे.
आधी नितीश, मग लालनोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार बनलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमार यांच्याशी जवळीक साधली होती, कारण तेव्हा नितीश कुमार व लालुप्रसाद यादव यांच्या आघाडीची बिहारमध्ये सत्ता होती; पण मध्येच नितीश कुमार यांनी लालुप्रसाद व काँग्रेस यांची साथ सोडली आणि त्यांनी भाजपशी युती करून सरकार बनवले. मग शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांशी भेटीगाठी कमी केल्या आणि लालुप्रसाद यांच्याकडे जाणे वाढवले. प्रत्यक्षात उमेदवारी मिळवली ती मात्र काँग्रेसची!