UP Board topper Prachi Nigam : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश बोर्डात प्रथम आलेली प्राची निकम नावाची विद्यार्थीनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. प्राचीचे चर्चेत असण्याचे कारण तिचे गुण नसून तिच दिसणं आहे. सोशल मीडियावर प्राचीला तिच्या दिसण्यावरुन मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. दुसरीकडे काहींनी तिचा आत्मविश्वास ढासळू नये म्हणून प्राचीची पाठराखण देखील केली आहे. मात्र या सगळ्यात प्राचीचं समर्थन करण्याच्या नादात एका शेव्हिंग कंपनीने केलेल्या जाहीरातीमुळे नवा वाद उफाळून आलाय.
उत्तर प्रदेशात दहावीच्या परीक्षेत पहिली आलेली प्राची निगम सध्या चर्चेत आली होती. निकाल समोर आल्यानंतर प्राचीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते. मात्र तिच्या चेहऱ्यावरील केसांमुळे प्राचीला वाईटप्रकारे ट्रोल केलं जाऊ लागलं. यानंतर अनेक जण तिच्या बाजूने अनेकजण पुढे आले आणि त्यांनी या ट्रोलिंगला विरोध केला.
दुसरीकडे, प्राची निगमच्या समर्थनार्थ बॉम्बे शेव्हिंग कंपनीने वर्तमानपत्रात एक पानभर जाहिरात दिली आहे. मात्र, या 'संधी'चे भांडवल करण्याची कंपनीची कृती असल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. प्राचीच्या फोटोनंतर आता कंपनीची जाहिरातही सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. बॉम्बे शेव्हिंग कंपनीने प्राची निगमच्या समर्थनार्थ केलेल्या जाहीरातीवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्राची निगमचे नाव शेव्हिंग कंपनीच्या 'never get bullied campaign'मध्ये वापरले गेले होते. बॉम्बे शेव्हिंग कंपनीने एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्राचीच्या समर्थनार्थ जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेक यूजर्सनी कंपनीला ट्रोलह केले. अनेकांनी प्राचीला कंपनीवर खटला दाखल करण्यास सांगितले आहे.
जाहिरातीमध्ये काय म्हटलंय?
या जाहिरातीत प्राची निगमला उद्देशून, "प्रिय प्राची, ते आज तुझ्या केसांना ट्रोल करत आहेत, उद्या ते तुझ्या A.I.R. (ऑल इंडिया रँक) ची प्रशंसा करतील." असं लिहीलं होतं. मात्र, जाहिरातीच्या शेवटच्या ओळीवरून वाद निर्माण झाला आहे. ज्यामध्ये "आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा रेझर वापरण्याबाबत कधीही चिंता करावी लागणार नाही," असं म्हटलं आहे.
मार्केटिंगसाठी प्राचीचा वापर?
मात्र ही जाहिरात व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कंपनीवर टीका करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने ही बॉम्बे शेव्हिंग कंपनीची कमी दर्जाची जाहिरात आहे, असं म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने "सामाजिक संदेशाच्या रुपात मार्केटिंग. प्राची निगम बॉम्बे शेव्हिंगकडून तिचे नाव आणि हुशारीने तयार केलेल्या कॉपीमध्ये तिचा संघर्ष वापरण्यासाठी ब्रँड एंडोर्समेंट फीची मागणी करू शकते का?" असा सवाल केला आहे.
प्राचीचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर
दरम्यान, प्राची निगमनेही ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'माझे कुटुंब, माझे शिक्षक किंवा माझे मित्र कधीही माझ्या दिसण्याबद्दल काहीही बोलले नाहीत आणि मी त्याची काळजीही केली नाही. निकालानंतर माझा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांनी मला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मग माझं लक्ष याकडे गेलं. पण माझे यश हीच आता माझी ओळख आहे याचा मला आनंद आहे,’ असं प्राचीनं म्हटलं आहे.