ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्सनंतर डॉक्टर शॉना पांड्या ही भारतीय वंशाची अवकाशात जाणारी तिसरी महिला ठरणार आहे. कॅनडाच्या अल्बर्टा युनिवर्सिटीमध्ये त्या न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत.
कॅनडामध्ये जन्मलेल्या पांड्या यांची नागरिक विज्ञान अंतराळवीर (CSA) या कार्यक्रमांतर्गत निवड झाली आहे. 32 वर्षीय पांड्या या जैव-औषध आणि वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील प्रयोग अवकाशात करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. त्या सध्या मुंबईतील महालक्ष्मी येथे त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आल्या आहेत. पोलार सबऑर्बिटल सायन्स (PoSSUM) या प्रोजेक्टचा त्या भाग असणार आहेत. या दरम्यान त्या हवामानातील बदलाचा परिणाम याचा अभ्यास करतील. तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये (PHEnOM) शारीरिक, आरोग्य, पर्यावरणाचा त्या अभ्यास करतील. त्या Poseidon या प्रोजेक्टचाही भाग आहेत. हा प्रोजेक्ट फ्लोरिडामध्ये अॅक्वेरिस स्पेस रिसर्च फेसिलिटीमध्ये 100 दिवस पाण्याखाली राहण्याचं मिशन आहे. हिदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
अंतराळवीर बनणं ही लहानपणापासून त्यांची आवड होती, पण त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रावर त्यांचं प्रेमही होतं असं त्या म्हणाल्या. शॉना पांड्या यांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू आहे. त्या गायिका, लेखक आणि आंतरराष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनही आहेत.