ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १३ - किडनीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुतापा बोस (३६) या कोलकात्यातील महिलेचा मंगळवारी अचानक ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुतापाला तिचे आयुष्य वाढवण्यासाठी किडनीची आवश्यकता होती. पण तिला अखेरपर्यंत किडनी डोनर मिळाला नाही. आपल्या कुटुंबावर जी परिस्थिती ओढवली ती दुस-यांवर ओढवू नये याच भावनेतून सुतापाच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूनंतर लगेच डॉक्टरांना फोन करुन अवयवदानाची तयारी दाखवली.
पण अवयवदानाची एक प्रक्रिया असते. वेळेअभावी अवयवदान शक्य झाले नाही. पण सुतापाचे डोळे काढण्यात आले. यामुळे आणखी दोघांना नवी दृष्टी मिळणार आहे. दीडवर्षांपूर्वी सुतापाची किडनी निकामी झाली. तेव्हापासून तिचे डायलासिस सुरु होते. डॉक्टरांनी यावर किडनी प्रत्यारोपणाचा दीर्घकालीन उपाय सुचवला होता.
तेव्हापासून सुतापाचे कुटुंबिय किडनी डोनरच्या शोधात होते. या महिना अखेरीस तिच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. पण त्यापूर्वीच मंगळवारी सकाळी अचानक ह्दयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. सुतापाच्या पश्चात पाचवर्षांची मुलगी आणि पती असा परिवार आहे.