उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. निकाहाच्या ४ दिवसानंतरच नवविवाहितेने बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची परिसरासह मुरादाबादमध्ये चांगलीच चर्चा हो आहे. विशेष म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर त्या मुलीच्या पतीने तिला तीन तलाक देत घरातून बाहेर काढले. त्यामुळे, पीडित मुलीने लहान बाळास घेऊन प्रियकराचे घर गाठले. मात्र, प्रियकराने मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर, पीडितेच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.
मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर प्रियकराने मुलीसोबत निकाह करण्याची तयारी दर्शवली आहे. सिव्हील लाईन पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. अगवानपूरच्या रहिवाशी तरुणीचा निकाह ११ ऑक्टोबर रोजी मुगलपुरा क्षेत्रातील एका युवकासोबत झाला होता. मात्र, सासरी पोहोचल्यानंतर ४ दिवसांतच पीडितेने एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे, सासरच्या मंडळींनी तात्काळ याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला आणि नवरदेवाने मुलीला तीन तलाक देऊन घरातून बेदखल केलं. मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला धोका दिला आहे. कारण, मुलगी अगोदरच गर्भवती असतानाही त्यांनी मुलीचा विवाह माझ्यासोबत लावला. आम्हाला लग्नापूर्वी कुठलीच कल्पना देण्यात आली नव्हती, असेही नवरदेवाने म्हटले आहे.