Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या सध्या स्कॉटलंडच्या Balmoral castle मध्ये वास्तव्यास होत्या. या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. दरम्यान, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला.
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. “महाराणी एलिझाबेथ यांना आमच्या वेळच्या दिग्गजांच्या रुपात स्मरणात ठेवलं जाईल. त्यांनी सार्वजनिक जीवनात सन्मान दाखवला. त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं आहे आणि माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब आणि ब्रिटनच्या जनतेसोबत आहेत,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या भेटीदरम्यानचीही एक आठवण सांगितली. “२०१५ आणि २०१८ या कालावधीत ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबत झालेली भेट अविस्मरणीय आहे. या भेटीदरम्यान त्यांनी मला तो रुमाल दाखवला जो महात्मा गांधी यांनी त्यांच्या विवाहाच्या वेळी भेट म्हणून दिला होता. मी हे कायम लक्षात ठेवेन,” असं मोदी म्हणाले.