पाटणा : लग्नानंतरशिक्षण घेण्यास व नोकरी करण्यास मज्जाव करणाऱ्या पतीला सोडचिठ्ठी देण्याची व आपले करिअर घडविण्याची अनुमती एका मुलीला ग्रामकचेरीने (गावातील न्यायालय) दिली आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ही घटना घडली. (She Leave husband for education after marriage)
या मुलीचे दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतरही तिला आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्याची इच्छा होती. नोकरी लागली की, ती पुढचे उच्च शिक्षण घेणार होती. पण, त्याला पती सुनीलकुमार व सासरच्या मंडळींनी विरोध दर्शविला होता. शिक्षण, करिअरसाठी तळमळणाऱ्या या मुलीने आपल्या ध्येयापायी गावातून निघून पाटणा गाठले. मात्र, ती बेपत्ता असल्याची तक्रार या मुलीचे वडील गुरुदेव पंडित यांनी पोलिसांत दाखल केली होती. तिचे अपहरण झाले असावे, अशी त्यांना शक्यता वाटत होती.
ही मुलगी व तिचा पती यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही ग्रामकचेरीसमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. तिथे या मुलीने सांगितले की, मी दबावाखाली हे लग्न केले आहे. मला करिअर करायचे असून, त्याच्या आड येणाऱ्या पतीपासून वेगळे व्हायचे आहे.
दीड महिन्यापूर्वी झाला होता विवाहमुलीच्या वडिलांनी ग्रामकचेरीला सांगितले की, हिंदू रितीरिवाजाप्रमाणे या दोघांचा जूनमध्ये विवाह झाला होता. पतीला सोडचिठ्ठी देण्याची परवानगी देऊन ग्रामकचेरीने माझे आयुष्य वाचविले आहे, असे सांगत या मुलीने सर्वांचे आभार मानले.