मुंबई - बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंदी आहे. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले आहेत. तसेच तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभार मानले आहेत. मात्र, आता एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील वक्तव्यामुळे कंगना ट्रोल होत आहे. जेव्हा मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं, असे कंगनाने म्हटले आहे.
देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं कंगनाने म्हटलं आहे.
कंगनाच्या या स्वातंत्र्यासंदर्भातील विधानावरुन तिला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर कंगनाचा व्हिडिओ व्हायरल होत असून तिला नेटीझन्सकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. ट्विटर युजर रोफी गांधी या हँडलवरुन कंगनाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. लाकडाच्या घोड्यावर प्लॅस्टीकची तलवार घेऊन बसणारी वीरांगना, सरकारची बोली बोलणारी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचा अपमान करत आहे. हजारो भारतीयांच्या बलिदांनाला भीक म्हणते आहे, असेही या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.