ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. 6 - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी एका 15 वर्षाच्या मुलीने स्वत:च्या रक्ताने निवडणूक आयोगाला पत्र लिहील्याची घटना समोर आली आहे. गाझीयाबादमध्ये रहाणारी ही मुलगी 15 वर्षांची असून 10 व्या इयत्तेत शिकते.
रक्ताने पत्र लिहीण्यासाठी या तरुणीने आणि तिच्या लहान भावाने घरातील सुई वापरुन शरीरातील रक्त काढले. हे पत्र ते शुक्रवारी टपाल बॉक्समध्ये टाकणार होते पण वडिलांनी त्यांना रोखले. राजकीय घटनांनी विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचा मी माझ्या मुलाना सल्ला दिलाय असे वडिलांनी सांगितले.
सध्या समाजवादी पक्षात अखिलेश आणि मुलायम या दोन गटात यादवी सुरु असून दोघांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह सायकलवर दावा
सांगितला आहे. समाजवादी लॅपटॉप योजनेबद्दल ऐकल्यापासून त्यांना अखिलेश यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. त्यांना फ्रि लॅपटॉप हवा आहे. त्यासाठी अखिलेश यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. एका माणसाने काही मुद्दांवर लक्ष वेधून घेण्यासाठी रक्ताने पत्र लिहील्याची बातमी त्यांनी वाचली होती. त्यावरुन या मुलांना रक्ताने पत्र लिहीण्याची कल्पना सुचली असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.