लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला ‘शीशमहाल’ म्हणण्यावरून भाजप आणि आप आमनेसामने आले. याबाबत बुधवारी दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरले होते.
आपचे खासदार संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज पत्रकारांना सोबत घेत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात जाण्यासाठी निघाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सोन्याचे टॉयलेट, जलतरण तलाव, मिनी बार असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत. त्यामुळे आम्ही ते आहे की नाही, हे दाखविण्यासाठी आलो असल्याचे संजय सिंह म्हणाले. यावेळी सिंह व सौरभ भारद्वाज यांना बुधवारी पोलिसांनी वाटेतच रोखले.
संजय सिंह यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला २७०० कोटी रुपयांचा राजवाडा म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडले. यानंतर सिंह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले. यानंतर दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हे दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या बंगल्याबाहेर पोहोचले. ते म्हणाले की, आतिशी यांच्याकडे दोन बंगले आहेत. ‘बंगलेवाल्या देवीला’ अजून किती बंगले हवे आहेत?
काँग्रेसनेही घेतली वादात उडी
भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही शीशमहाल वादात उडी घेतली. काँग्रेस नेते गुरुदीप सिंग सप्पल म्हणाले की, काँग्रेस पक्षाने ५५ वर्षे सत्ता चालविली आहे. गांधी परिवाराने आपले आनंद भवन देशाला दान केले होते.
इंडिया आघाडी फुटली
दिल्ली निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडी फुटली असून, आपला ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी केजरीवाल निवडणुका जिंकणार असा संभ्रम जनतेत पसरवत आहेत. या विधानाला केजरीवाल यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भाजप आणि काँग्रेसची छुपी युती उघड झाली आहे.
२५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत : काँग्रेस
- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी ‘जीवन रक्षा योजना’ जाहीर केली. याअंतर्गत सत्तेत आल्यास दिल्लीतील जनतेला २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्याचे आश्वासन दिले आहे.
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची ही दुसरी ‘हमी’ आहे. यापूर्वी, त्यांनी ‘प्यारी दीदी योजना’ जाहीर केली असून, यात दिल्लीतील पात्र महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. आपनेही महिलांसाठी आश्वासन दिले आहे.
२६ वर्षांनंतर भाजप सत्तेत येणार?
- भाजप २६ वर्षांहून अधिक काळानंतर दिल्लीत सत्तेत येण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.
- अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपवर भ्रष्टाचाराच्या आरोप करत आपल्या ‘परिवर्तन’ घोषणेवर भाजप लक्ष केंद्रित करत आहे.
- भाजप २ डिसेंबर १९९३ आणि तीन डिसेंबर १९९८ दरम्यान दिल्लीत सत्तेत होती.
- त्यावेळी दिल्लीत भाजपचे तीन मुख्यमंत्री झाले. यात मदन लाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांचा समावेश आहे.