सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुजरातमधल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान ते बोलत होते. मोदी म्हणाले, ज्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत स्वतंत्रता नाही, ते पक्षाच्या लोकांसाठी कसं काम करू शकतील. मी तरुण नेते शहजाद पूनावालांना सांगू इच्छितो की, तुम्ही फारच हिमतीचं काम केलं आहे.परंतु दुर्दैवानं काँग्रेसमध्ये नेहमीच असं होत असतं. शहजाद यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणा-या अफरातफरीचा भांडाफोड केला आहे. शहजाद पूनावाला हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेसनं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांना पक्षाच्या सोशल मीडिया ग्रुपमधूनही काढून टाकण्यात आलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव राहिलेल्या शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींच्या निवड प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित करत हे इलेक्शन नव्हे, तर सिलेक्शन आहे, असं म्हटलं होतं.
'शहजाद'नं काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या अफरातफरीचा केला खुलासा- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 4:30 PM