नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असून, यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने गुरुवारी शीला दीक्षित यांच्या नावाची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आधी पक्षाने, राज बब्बर यांची प्रदेशाध्यपदी निवड केली आहे.दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा अनुभव असलेल्या दीक्षित यांची निवड अनुभवाच्या व चांगल्या प्रतिमेच्या बळावर झाली आहे. ही खूप मोठी जबाबदारी असून, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे आपण आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया शीला दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.प्रियांका गांधी या अत्यंत लोकप्रिय नेत्या असून, त्यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला तर आपल्याला अत्यंत आनंद होईल असं त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितलं. शीला दीक्षित या उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे वजनदार नेते उमाशंकर दीक्षित यांच्या सून आहेत. उत्तर प्रदेशची आपण सून असून, या राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावायला आवडेल, असेही त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशसाठी निवडणूक रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी शीला दीक्षित यांच्या नावाची शिफारस केल्याचे सांगितले जाते. ब्राह्मण उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जात आहे. याआधीही दोन वेळा त्यांचे नाव पुढे आले होते. त्यापैकी एकदा त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अनिच्छा व्यक्त केली होती. दुसऱ्यांदा त्यांनी होकार वा नकार देण्याऐवजी राजकारणात काहीही घडू शकते, असे उत्तर दिले होते.टँकर घोटाळाप्रकरणी एसीबीची नोटीसशीला दीक्षित यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४०० कोटी रुपयांच्या कथित पाणी टँकर घोटाळाप्रकरणी नोटीस जारी केली आहे. तपासात सहकार्य करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. मात्र आपल्यावरील आरोप हे राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप शीला दीक्षित यांनी केला आहे. एसीबीचे प्रमुख एम.के. मीणा यांनी सांगितले की, शीला दीक्षित आणि दिल्ली जल बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांना नोटीस पाठविली आहे. त्या सर्वांची २६ जुलै रोजी चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात एसीबीला दोन तक्रारी मिळालेल्या आहेत. या तक्रारीत शीला दीक्षित आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नावे आहेत. या प्रकरणात या दोन्ही नेत्यांची चौकशी केली जाईल, असे मीणा यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
शीला दीक्षित मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार
By admin | Published: July 15, 2016 2:39 AM