नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी (20 जुलै) निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. शीला दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. मी तिला गमावले आहे. आई गमावल्याचे दुःख विसरता येत नाही. जेव्हा जेव्हा दिल्लीच्या विकासाबाबत लोक बोलतील तेव्हा शीलाजींची नेहमीच आठवण काढतील' अशा भावना संदीप दीक्षित यांनी व्यक्त केल्या आहेत. शीला दीक्षितांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शीला दीक्षित यांचे अंत्यदर्शन घेतले आहे.
काँग्रेसमधील सामर्थ्यशाली नेत्या समजल्या जाणाऱ्या शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 मध्ये पंजाबमधील कपूरथलामध्ये झाला. दिल्लीतील कॉन्वेंट ऑफ जीसस एँड मेरी स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयातून त्यांना एमएची पदवी घेतली. 1984 ते 1989 या कालावधीत त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशच्या कन्नौजचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर पुढे त्या दिल्लीचा चेहरा झाल्या. दिल्लीतील अनेक विकासकामं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाली.
सर्वाधिक काळ दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान दीक्षित यांच्याकडे जातो. 1998 ते 2013 या कालावधीत त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. गांधी कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्या अशी त्यांची ओळख होती. दीक्षित यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामं झाली. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत मेट्रो धावली.
शीला दीक्षित यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता ''हा'' शेवटचा संदेशशेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रिय असलेल्या शीला दीक्षित यांनी निधन होण्यापूर्वी काही काळ आधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संदेश दिला होता. उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथील हत्याकांडातील पीडितांना भेटण्यास गेलेल्या प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेली अडवणूक न थांबल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. दरम्यान, या आवाहनानंतर काही काळानेच शीला दीक्षित यांचे निधन झाल्याने त्यांनी दिलेला हा संदेश शेवटचा संदेश ठरला.
शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या किरण वालिया यांनी सांगितले की, ''शीला दीक्षित यांनी आपल्या शेवटच्या संदेशामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्या स्वत: आंदोलनासाठी उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीत दिल्लीमधील कार्यकारी अध्यक्ष हारुन युसूफ हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार होते.''