ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने आज शीला दीक्षित यांच्या नावाची घोषणा केली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेसने आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आधी पक्षाने, राज बब्बर यांची प्रदेशाध्यपदी निवड केली तर आता दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेल्या दीक्षित यांची निवड अनुभवाच्या व चांगल्या प्रतिमेच्या बळावर झाली आहे. ही खूप मोठी जबाबदारी असून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे आपण आभारी आहोत अशी प्रतिक्रिया शीला दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.
प्रियांका गांधी या अत्यंत लोकप्रिय नेत्या असून त्यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला तर आपल्याला अत्यंत आनंद होईल असं त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. शीला दीक्षित या उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे वजनदार नेते उमाशंकर दीक्षित यांच्या सून आहेत. उत्तर प्रदेशची आपण सून असून या राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावायला आवडेल असेही त्यांनी म्हटले आहे.